Saturday, April 12, 2008

हल्ली ग्रामीण भागाला नावं ठेवायची सगळ्यांना मुळी सवयच झाली आहे. काय तर म्हणे तुमच्याकडे सारखे लाईट जातात...अरे पण जेव्हा लाईट येतात किंवा अधुन-मधुन असतात तेव्हाच जातिल ना? काहीतरीच आपलं!

आणि राज्यकर्त्यांना कसली हो नावं ठेवताय? ते तर खरे गांधीवादी आहेत. गांधीजींनी म्हंटल होतं ना खेड्याकडे चला, हे म्हणतात खेड्यातुन चला नाहीतर गांधीजींची तत्व आमलात आणा!.... कशी?

चरखा चालवा... तो चालवायला काय वीज लागते?

उकाड्यामधे पुरुषांना त्यांच्यासारखं एकवस्त्र बसता येतं, रात्री लाईट नाही बघतय कोण?

संध्याकाळी समुद्रावरचा नैसर्गिक वारा अनुभवता येतो! मित्रपरिवाराला भेटी देता येतात... कारण TV बघायला वीज नसते.. म्हणुनच आम्ही नाही बाई सिरीअल्सना रटाळ रटाळ म्हणत, आम्ही बघतच नाही!

आम्हाला नाही जिममध्ये जायला लागत, विहीरीचं पाणी ओढतो ना आम्ही..pumpsets आहेत हो पण लाईट असतील तर ते चालतील ना!

आता तर पाटा-वरवंटा पण उपयोगात येऊ लागलाय त्यामुळे टाकी लावणा-या लोकांचा बसत चाललेला धंदा जोरात आलाय.

कदाचित काही वर्षांनी जातं सुद्धा परत वापरु, आहत कुठे?

मग काय रडता लाईट नाहीत. लाईट नाहीत म्हणुन, अहो आता शहरी पाहुण्यांचीही वर्दळ नसते ’very boring rural life'

आम्ही आता अध्यात्माकडे सुद्धा वळायला लागलो आहोत!

"ठेविले ’दिलीपे’ (मा. दिलीप वळसे-पाटील.. मा. म्हणजे माननीय नाही मारावेसे वाटतात ते!)

तैसेचि रहावे चित्ती असु द्यावे समाधान!

मग पेला अर्धा भरलेला आहे ना?

थांबा हं, मेणबत्ती आणते ते पाहायला!

पहिलाच प्रयत्न

नमस्कार! सर्वप्रथम सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा, तसं बघायला गेलं तर आजकाल प्रत्येक दिवस नवा, प्रत्येक क्षण काहीतरी नाविन्याची अनुभुती देणारा, नवनवीन शोधांचा आणि आपल्याला अत्याधुनिकतेकडे नेणारा!
माझ्यासारख्या एका मध्यमवयीन बाईला (मानसिक वय १६-२०) त्याच्याशी जुळवून घेताना तारांबळ उडवणारा, त्याबद्दलचे हे असेच काही हल्के-फुल्के किस्से...

तसं माझं लग्न झालं आणि मी अलिबागला राहायला गेले, म्हणजे इतरांच्या मते खेडवळच बनले. पण मग ४-५ वर्षांपुर्वी मुलींच्या शिक्षणासाठी पुण्याला रहायला आले, तेव्हा मला mobile वाजला तर फक्त रिसिव्ह करता यायचा.
एक दिवस मी शेअररिक्षामधुन घरी जात होते. माझ्या शेजारी एक कॉलेजातला मुलगा बसला होता. बिच्चारा! खूपच काळजीत दिसत होता, बहुतेक सर्व विश्वाची चिंता त्याला सतावत असावी, कारण मधेच तॊ म्हं, म्हं असही म्हणत होता, एवढ्यात तो एकदम म्हणाला " मी रिक्षात आहे!".. ओह म्हणजे ह्याची स्मरणशक्ती वगैरे गेली होती की काय, आणि कदाचित ती आत्ताच परत आली.
मी त्याला अगदी प्रेमानी विचारलं आता कसं बरं वाटताय ना? बरं झालं बाबा तुझी memory परत आली ते, पण असं झालं तरी काय होतं तुला? त्यानी एकदम रागने माझ्याकडे बघितलं आणि कानातुन काहीतरी वायरी काढल्या आणि विचारलं "काकू तुम्ही अलिबागहुन आलात का?" मला खुप आनंद झाला, मी विचारलं "का रे तू सुद्धा? पण तुला कुठे पाहिल्याचं आठवत नाही!"
तो एअकदम ओरडला "नाही!".
मी म्हणाले, मग बरोबर तू ३१ डिसेंबरला ३ तासांचे १०००/- रुपये भरुन आला असशील ना आमच्या अलिबागला? तो परत दात-ओठ खाउन नाही असं ओरडला. खरचंच ह्याच्या डोक्यावर परिणाम झालेला दिसतोय, मी त्याचं अजुन काही प्रबोधन करण्याच्या आधी माझं उतरायचं ठिकाण आलं, मी नाईलाजाने उतरले.

घरी आले तर मुलगी computer च्या समोर बसली होती (बहूतेकवेळा तिकडेच असते.) सगळ्या खिडक्या बंद आणि पडदे टाकलेले, चुकचुकत बसली होती "oh, ही window का open होत नाहिये?" मी तिला म्हंटलं अगं एकतर मराठीत बोल नाहीतर पुर्ण english! आणि आपल्या खिडक्या अजुनतरी आपल्याला उघडायला लागतात, mouse वर click करुन नाही उघडत, मी आल्ये ना मी उघडते! ती अतिशय थंडपणे म्हणाली ’आई मी computerच्या windows विषयी बोलत्ये"

मी तिला मग रिक्षाचा सगळा किस्सा सांगितला आणि त्या मुलानी मी अलिबागची आहे हे ओळखल्याचंही सांगितलं! ती चिडुन म्हणाली "आई तू कशाला अनोळखी माणसांशी बोलायला जातेस आणि तोच काय इतर कोणिही असता तरी तो हेच म्हणाला असता, अगं त्यानी hands free device लावलं होतं, तो मोबाईलवर बोलत होता." ओह असं काही असतं का? मला काय माहित? हे तर (नवरा) घाटातसुद्धा एका हातात mobile धरुन एका हतने driving करत तासंतास बोलतात!

आता मात्र मी सगळं शिकुन घेतलं आहे हे, म्हणजे बघा ना आत्तासुद्धा blog लिहित्ये कि नाही?
माझ्या मुलीला जी साता समुद्रांपार असलेल्या आपल्या मित्राशी बोलते पण तिला एक वितीच्या अंतरावर आपल्यामागे उभ्या असलेल्या आईचं बोलणं ऐकु येत नाही तिला मी आता sms करते.
नव-याला फोनवरच विचारते तुम्हाला माझ्याशी समोरसमोर बोलायला कधी वेळ आहे?

तुम्हाला असं नाही वाटत जग जवळ येत असताना नाती दुरावताय्त. जी गणितं आपण तोंडी करत होतो त्याला आता calculator वापरतोय, वाढदिवस लक्षात ठेवायला reminders लागताय्त!
असं म्हणतात माकडांनी आपल्या शेपटीचा उपतोग केला नाही म्हणुन त्याच्या बिनशेपटिचा माणुस झाला, आपण आपला मेंदू वापरला नाही तर पुढे जाऊन आपली बिनमेंदुंची माकडं तर होणार नाहीत ना?

bye...भेटू पुन्हा!